मुंबई : विराट कोहलीची टीम इंडिया आज रात्री विंडीजला रवाना होणार आहे. त्याआधी आज मुंबईमध्ये विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत विराटनं गेल्या काही दिवसांत टीम इंडियातल्या मतभेदांबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. विराटनं यावेळी टीम इंडियामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा केला आहे.


गेल्या काही दिवसांत रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्यात मतभेत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर आज विराट कोहलीने भाष्य करत मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले आहे. "रोहित शर्मा बरोबर माझे मतभेत असल्याचे मी ऐकले आहे. ड्रेसिंग रुममधले वातावरण हे यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. जर माझे आणि रोहितचे मतभेद असते तर आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नसतो", असे विराट कोहलीने म्हटले आहे.

यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील रोहित शर्मा आणि विरोट कोहली यांच्यातील मतभेदाबाबतचे वृत्त फेटाळले आहे. "मी ड्रेसिंग रुमचा भाग होतो आणि तिथे असं काहीही नव्हतं", असं शास्त्री यांनी म्हटले आहे.

याच पत्रकार परिषदेत विराटला टीम इंडियाच्या भावी प्रशिक्षकाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरातच विराटनं प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे.