मुंबई : गंभीर आजारपण, मोठ्या शस्त्रक्रिया, महागडे उपचार यांचा खर्च अनेकांना परवडत नाही. मात्र आता मुंबईचे महापौर आणि नगरसेवक मुंबईकरांना मदतीचा हात देणार आहेत. मुंबईतील गरजू रुग्णांना आता महापौर निधीतून थेट 15 ते 25 हजारांची मदत मिळणार आहे.

मुंबईचे नगरसेवकही मुंबईतील रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांचे एका महिन्याचे मानधन महापौर निधीला देणार आहेत. मुंबईतील गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी महापौर निधीत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईमधील गरजू रुग्णांना महापौर निधीमधून वैद्यकीय आर्थिक मदत केली जाते. या निधीमधून आतापर्यंत  प्रत्येकी पाच हजार रूपये मदत केली जात होती. यात तब्बल आठ वर्षांनी वाढ करून ही रक्कम आता 15 ते 25 हजार रुपये इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर निधीमधून 2011 पासून प्रत्येक गरजू रुग्णाला पाच हजार रुपये इतकी मदत केली जात होती. महापौर निधी समितीची बैठक होत नसल्याने आणि महापौर निधीमध्ये वाढ होत नसल्याने या निधीमध्ये गेल्या आठ वर्षात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळेल या अपेक्षेने मुंबईकर मोठ्या प्रमाणात महापौरांकडे अर्ज करतात. मात्र निधी नसल्याने गरजू रुग्णांना जास्त रक्कम देता येत नव्हती.

महापौर निधीमधून देण्यात आलेले पाच हजार रुपयांचे धनादेश अनेक रुग्णालये स्वीकारत नव्हती. यामुळे आज तब्बल आठ वर्षांनी आज महापौर निधी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रुग्णांना देण्यात येणारी रक्कम पाच हजार वरून 15 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बायपास तसेच मोठ्या शस्त्रक्रियांसाठी 25 हजार रुपये इतकी मदत देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

गरजू रुग्णांना देण्यात येणारी रक्कम वाढवल्यावर महापौर निधीमध्ये वाढ व्हावी म्हणून मुंबईमधील सर्व 227 नगरसेवकांना त्यांचे एक महिन्याचे मानधन महापौर निधीमध्ये जमा करण्याचे आवाहन केले जाणार आहे.

तसेच मुंबईच्या नगरसेवकांना दरमहा 25 हजार रुपये इतके मानधन दिले जाते. त्यामधून 56 लाख रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे. दानशूर व्यक्ती आणि मोठ्या कंपन्यांशीही संपर्क साधला जाणार आहे.  तसेच 'महापौर रजनी'सारखे कार्यक्रम आयोजित करून वर्षभरात पाच कोटी इतकी रक्कम जमा केली जाणार आहे.