वन डेत 32, कसोटीत 18, विराटचा शतकांचा खजिना
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2017 01:54 PM (IST)
विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे अठरावं शतक ठरलं. वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत विराटच्या खजिन्यात 32 शतकं आहेत.
कोलकाता: विराट कोहलीनं कोलकाता कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी करुन आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक साजरं केलं. त्याच्या या झुंजार खेळीनं टीम इंडियाला पराभवाच्या संकटातूनही वाचवलं. विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे अठरावं शतक ठरलं. वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत विराटच्या खजिन्यात 32 शतकं आहेत. कसोटीतील 18 + वन डेतील 32 अशी कोहलीची 50 शतकं आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आठव्या स्थानावर दाखल झाला आहे. कोलकाता कसोटीत मधल्या फळीतील फलंदाजांनी साथ सोडल्यानंतर, कर्णधार विराट कोहलीने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत खिंड लढवली. इतकंच नाही तर कोहलीने शतकही झळकावलं. विराटने श्रीलंकेचा हुकमी गोलंदाज लकमलला थेट सिक्सर ठोकून शतक पूर्ण केलं. या शतकानंतर टीम इंडियाने तातडीने डाव घोषित केला. या कसोटीत टीम इंडियानं आपला दुसरा डाव आठ बाद ३५२ धावांवर घोषित केला असून, श्रीलंकेसमोर विजयासाठी २३१ धावांचं आव्हान आहे. https://twitter.com/BCCI/status/932524038043213824