कोलंबो : विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे सामन्यांच्या मालिकेतही क्लीन स्विपची नोंद केली. भारताने कोलंबोच्या पाचव्या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून पाच सामन्यांच्या मालिकेवर 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे कारकीर्दीतलं तिसावं शतक पूर्ण करत सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसोबत तो दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

विराटच्या शतकांचा वेग

सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर कायम आहे. मात्र विराट कोहलीचा शतकांचा वेग पाहता तो लवकरच सचिनलाही मागे टाकू शकतो. विराटच्या शतकांचे आकडे पाहिले, तर हे सहज शक्य दिसतं.

विराटने 186 इनिंगमध्ये 30 शतकं पूर्ण केले. सचिनला 30 शतकं पूर्ण करण्यासाठी 267 इनिंग खेळाव्या लागल्या, तर रिकी पाँटिंगला यासाठी 349 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या.

विराटने 186 इनिंगमध्ये 30 शतकं पूर्ण केली. सचिनचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 16, तर पाँटिंगचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 15 शतकं होते. म्हणजेच विराटने या दिग्गजांच्या दुप्पट वेगाने शतकं पूर्ण केली आहेत.

एका वर्षात 1000 धावा पूर्ण

विराटने या वर्षात 92.5 च्या स्ट्राईक रेटने या वर्षातील 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. एवढ्या वेगाने एका वर्षात 1000 धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. सचिनने एका वर्षात सात वेळा एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत, तर सौरव गांगुली, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांनी प्रत्येकी एका वर्षात सहा वेळा 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

विराटच्या नेतृत्त्वात तीन व्हाईटवॉश

भारताने एखाद्या संघाला सहाव्यांदा व्हाईटवॉश दिला. तर श्रीलंकेला दिलेला हा दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताने यापैकी तीन वेळा विराटच्या नेतृत्त्वात, दोन वेळा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात आणि एकदा गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात व्हाईटवॉश दिला आहे.

संबंधित बातम्या :

श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर 5-0 ने मात देणारा भारत एकमेव संघ!


सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर!


क्लीन स्विप! पाचव्या वन डेत श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून धुव्वा


वन डेत सर्वाधिक स्टम्पिंग धोनीच्या नावावर!