गणेश विसर्जन मिरवणुकीत पिकअप गाडीनं भाविकांना चिरडलं
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2017 07:50 AM (IST)
चंद्रपूर जिल्ह्यातील वायगावमध्ये काल रविवारी संध्याकाळी गणपती विसर्जन मिरवणूक सुरु होती. मात्र गणेशमूर्ती असलेली पीकअप गाडी अचानक कुणीतरी सुरु केली आणि गाडी मिरवणुकीत घुसली.
चंद्रपूर : चंद्रपूरच्या वायगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत पीकअप गाडी घुसल्यानं एका तरुणीचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. मिरवणुकीत नाचणाऱ्या भाविकांना या गाडीनं चिरडलं. चालकानं गाडीला चावी लावून ठेवल्यानं हा अपघात झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वायगावमध्ये काल रविवारी संध्याकाळी गणपती विसर्जन मिरवणूक सुरु होती. मात्र गणेशमूर्ती असलेली पीकअप गाडी अचानक कुणीतरी सुरु केली आणि गाडी मिरवणुकीत घुसली. चालकानं न्यूट्रल गिअरमध्ये ठेवली होती, तसंच चावीही गाडीलाच लावून ठेवली होती. कुणीतरी चावी फिरवली आणि गाड़ी सुरु होऊन मिरवणुकीत घुसली. यात एका 18 वर्षीय मुलीला आपला जीव गमावावा लागला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बंद असलेल्या वाहनाची चावी काढून न घेता अडकवून ठेवल्याने हा प्रताप घडला असून वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे.