नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली शंभर टक्के शाकाहारी झाल्याचं वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिलं आहे. या वृत्तानुसार विराटने आपल्या आहारातून मांस, मासे आणि अंडी वर्ज्य केली आहेत. इतकंच काय, पण तो दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थही खाण्याचं आवर्जून टाळत आहे.
व्हेजन या कडक शाकाहाराच्या अमेरिकी संकल्पनेत दूधही वर्ज्य असतं. कारण ते थेट प्राण्याच्या शरीरातून मिळतं. विराटने 2012 सालानंतर भारतीय पद्धतीच्या चौरस आहारावर काठ मारली होती. जिभेचे चोचले पुरवणारे मसाले आणि तेलतूप त्याने आवर्जून टाळलं.
गेल्या चार महिन्यांपासून विराटच्या आहार नियंत्रणाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. त्याने आपल्या आहारात प्रोटिन शेक, भाज्या आणि सोयाचा समावेश केला आहे.
कडक शाकाहाराने त्याला मानसिक शांती मिळायला मदत झाल्याचं सांगितलं जात आहे. विराटची पत्नी अनुष्काही व्हेजन आहार घेते. सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनी, माजी धावपटू कार्ल लुईस, फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन हे दिग्गज व्हेगन आहार घेतात.
फुटबॉलवीर लायनेल मेसीही विश्वचषकाच्या कालावधीत व्हेजन आहारावर असतो.
अनुष्काने यापूर्वीच प्राणी अधिकार संघटना पेटाच्या समर्थनार्थ शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला होता. आता विराटनेही आहाराच्या बाबतीत पत्नीच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.
विराटला बिर्याणी, चिकन आणि अंडी प्रचंड आवडतात. बटर चिकन हा त्याचा आवडीचा पदार्थ आहे. पण फिटनेससाठी विराटने आवडीच्या पदार्थाचा त्याग केला आहे.