मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांची माफी मागितली आहे. आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, त्याबद्दल माफ करा, असं विराटने म्हटलं आहे.
दिग्गज फलंदाज आणि गोलंदाजांचा संघ म्हणून ओळख असणाऱ्या बंगळुरुने यंदाच्या आयपीएलमध्ये सपाटून मार खाल्ला. बंगळुरुला 13 सामन्यांपैकी केवळ दोन विजय मिळवता आले, तर 10 पराभवांचा सामना करावा लागला. पावसामुळे एक सामना अनिर्णित राहिला.
सुरुवातीच्या काही सामन्यात न खेळलेल्या विराटने शानदार पदार्पण करत अर्धशतक ठोकलं. मात्र त्यानंतरच्या सामन्यात विराटलाही खास कामगिरी करता आली नाही. त्याने एकूण 9 सामन्यात 250 धावा केल्या.
बंगळुरुचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, एबी डिव्हिलीयर्स आणि शेन वॅट्सन यांनाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा बंगळुरु यंदाचा पहिला संघ ठरला.