नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या नावांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ही शिफारस मान्य केल्यानंतर 25 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा होईल.
टीम इंडियाचा कर्णधार सध्याही जबरदस्त फॉर्मात असून, आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने अव्वल स्थान कायम राखलं आहे. त्यामुळे विराटच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास खेलरत्न मिळवणारा तो तिसरा क्रिकेटर ठरू शकतो. याआधी 1997 साली सचिन तेंडुलकर आणि 2007 साली महेंद्रसिंग धोनीला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
यंदा विराटच्या शर्यतीत दुसरं नाव वेटलिफ्टर मीराबाई चानू हे आहे. मीराबाईने गेल्या वर्षी जागतिक वेटलिफ्टिंगचं, तर यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं आहे.
अर्जुन पुरस्कारांसाठी या नावांची शिफारस
नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स), जिन्सन जॉनसन (अॅथलेटिक्स), हिमा दास (अॅथलेटिक्स), एन सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), सतीश कुमार (बॉक्सिंग), स्मृती मंधाना (क्रिकेट), शुभंकर शर्मा (गोल्फ), मनप्रीत सिंह (हॉकी), सविता (हॉकी), रवी राठोड (पोलो), राही सरनोबत (नेमबाज), अंकुर मित्तल (नेमबाज), श्रेयशी सिंह (नेमबाज), मनिका बत्रा (टेबल टेनिस), जी सथियान (टेबल टेनिस), रोहन बोपन्ना (टेनिस), सुमित (कुस्ती), पुजा काडिया (वुशु), अंकुर धामा (पॅरा अॅथलेटिक्स), मनोज सरकार (पॅरा बॅडमिंटन).