मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर निरुपम समर्थकांनी 'निरुपम आगे बढो'च्या घोषणाही दिल्या.
संजय निरुपम यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन दूर करण्यासाठी काँग्रेसचे काही नेते काल मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
"मी राहुल गांधी यांच्याशी एकनिष्ठ आहे. राहुल गांधी यांनी माझी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड आहे. मुंबईकरांच्या विविध प्रश्नांना लढा देण्यासाठी त्यांनी मला नियुक्त केलं आहे. राहुल गांधी सांगतील तोपर्यंत मी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहीन", असं संजय निरुपम म्हणाले.
काँग्रेसमध्ये निरुपम यांच्याविरोधात वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून निरुपम यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं जात आहे. काल संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. या भेटीचे मेसेज आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांना गेले होते.
काँग्रेसचे विद्यमान मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवून त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करावं, यासाठी काँग्रेस नेते आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यासाठी मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे मागणी केली होती.
मल्लिकार्जुन खर्गे यांची काल काँग्रेस नेत्यांनी मुंबईत भेट घेतली. यामध्ये आमदार नसिम खान, अमिन पटेल, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, सुरेश शेट्टी, कृपाशंकर सिंग, भाई जगताप गटाच्या इतर नेत्यांचा समावेश होता.
दरम्यान, संजय निरुपम यांचा मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता.
संबंधित बातम्या