नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या चकमकीत 13 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने ट्विटरवरून भारताविरोधात गरळ ओकली. पण आता आफ्रिदीविरोधात भारतीय दिग्गज खेळाडूंची फळी उभी राहिली आहे.


भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार कपिल देव आणि सचिन तेंडुलकरनं आफ्रिदीची बोलतीच बंद केली आहे. काश्मीर मुद्द्यावरून आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रासोबत इतर आंतरराष्ट्रीय संघटनांवरही ट्विटरच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, आफ्रिदीला गौतम गंभीर आणि सुरेश रैनानं चांगलंच खडसावलं. यानंतर आफ्रिदी चांगलाच ट्रोल झाला.


आफ्रिदीच्या ट्वीटला भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देशाविरोधी वक्तव्य करणाऱ्यांचं कधीही समर्थन करणार नाही. माझ्यासाठी देशाचं हित सर्वात मोठं असल्याची प्रतिक्रिया विराटने दिली आहे.


तर दुसरीकडे माजी कर्णधार कपिल देवनेही शाहिदला चांगलेच खडसावलं आहे. “शाहिद आफ्रिदीने आधी आपली पातळी ओळखावी, असं कपिल देव यांनी म्हटलंय. तसेच, त्याला इतकी महत्त्व देण्याची काहीही गरज नाही,” असा सल्लाही त्यांनी भारतीय माध्यमांना दिला आहे.


''काही पत्रकारांनी आफ्रिदीच्या ट्वीटबद्दल प्रतिक्रिया विचारली. मात्र त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे? आफ्रिदी ज्या यूएनबद्दल बोलतोय, त्याचा अर्थही त्याला माहित नाही. आफ्रिदीच्या शब्दकोशात यूएनचा अर्थ अंडर नाईन्टिन आहे, ज्याच्या पलिकडे त्याला काहीच माहित नाही. माध्यमांनी त्याला फार सीरियस घेऊ नये, तो नो बॉलवर विकेट साजरी करतोय,'' असा टोला गंभीरने काल लगावला होता.


तर सुरेश रैनानेही शाहिद आफ्रिदीला खडसावलं आहे. “काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ही देवभूमी आहे. याच भूमीत माझ्या पूर्वजांचा जन्म झाला. त्यामुळे या भूमीत रक्तपात थांबवण्यासाठी शाहिद आफ्रिदींनी आधी आपल्या सैन्याला आणि प्रशासनाला सांगावे. कारण, आम्हाल शांतता हवी आहे.”

तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही शाहिद आफ्रिदीला खडसावलं आहे. "देश चालवण्यासाठी सक्षम लोक आहेत. देश कसा चालवायचा हे कोणी आम्हाला शिकवू नये."

कोण कोण काय म्हणालं?


संबंधित बातम्या

आधी गंभीर म्हणाला सीरियस घेऊ नका, आता आफ्रिदी म्हणतो...

आफ्रिदीला फार सीरियस घेऊ नका : गंभीर