कोहलीच्या नेतृत्त्वाखालीच टीम इंडियानं गेल्या वर्षी कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान गाठलं आणि वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीतही मोठं यश मिळवलं. 2016 साली विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा असा ओघ वर्षभर सुरू राहिला.
टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारानं कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी20 या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये मिळून तब्बल 2,595 धावांचा रतीब घातला. कोहलीनं 2016 साली 12 कसोटी सामन्यांत 75.93 अशा भक्कम सरासरीनं 1,215 धावा ठोकल्या. त्याची सर्वोत्तम खेळी होती 235 धावांची. विराटनं यादरम्यान दोन अर्धशतकं आणि चार शतकं ठोकली. त्यात तीन द्विशतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे विराटनं सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतकं साजरी केली.
22 जुलै 2016, अँटिगा कसोटीत वेस्ट इंडीजविरुद्ध 200 धावांची खेळी.
9 ऑक्टोबर 2016, इंदूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध 211 धावा.
11 डिसेंबर 2016, मुंबई कसोटीत इंग्लंडविरुद्ध 235 धावा.
विराटनं धावांचे असे डोंगर रचलेच, पण एक कर्णधार म्हणून आपल्या टीमला विजयाचा मंत्रही दिला. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान परत मिळवलं. पण भारत सलग अठरा कसोटींमध्ये अपराजित राहिला आहे. 2016 या वर्षात भारतानं कसोटीत वेस्ट इंडीजला 2-0 असं, न्यूझीलंडला 3-0 असं आणि इंग्लंडला 4-0 असं हरवण्याचा पराक्रम गाजवला. त्यात कोहलीचं योगदान विसरता येणार नाही.
विराटनं 2016 साली वन डे क्रिकेटवरही आपला ठसा उमटवला. त्यानं 10 वन डे सामन्यांत 92.37च्या सरासरीनं 729 धावा फटकावल्या. विराटनं या वर्षी वन डेत तीन शतकं आणि चार अर्धशतकं साजरी केली. त्याची सर्वोत्तम खेळी होती नाबाद 154 धावांची.
ट्वेन्टी20च्या मैदानात तर विराटची बॅट आणखीनच तळपली. विराटनं 2016 साली 15 ट्वेन्टी-20 सामन्यांत 106.83च्या सरासरीनं 641 धावा कुटल्या. त्यानं यादरम्यान सात अर्धशतकं ठोकली. विराटची सर्वोत्तम खेळी होती नाबाद 90 धावांची. ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विराटची 55 धावांच्या खेळीनं भारतीय विजयाचा पाया घातला. याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी सामन्यात विराटच्या 82 धावांच्या खेळीनं भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं. विराट केवळ आक्रमक फलंदाज नाही, तर संघाच्या गरजेनुसार मोठी खेळी करण्याची क्षमता त्याच्याकडे असल्याचं याच खेळीनं दाखवून दिलं.
विराटनं हाच फॉर्म आयपीएलमध्येही कायम राखला आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरकडून चार शतकं ठोकली. आयपीएल 2016 मध्ये विराटनं 16 सामन्यांत 81.8च्या सरासरीनं 973 धावा ठोकल्या. त्यात चार शतकांसोबतच सात अर्धशतकांचाही समावेश होता. (81.8 सरासरी) विराटनं एकहाती खिंड लढवून आपल्या टीमला आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवलं.
कोहलीची धावांची भूक 2016 साली आणखीनंच वाढलेली दिसली. ती अजूनही शमलेली नाही. नव्या वर्षातही विराटनं धावांचे डोंगर रचत राहावं अशीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे