मुंबई : राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये 35 टक्क्यांनी घट झाल्याचं समोर आलं आहे. नोटाबंदीनंतर लाचलुचपत खात्याकडून लाच घेतानाचे गुन्हे नोंदवण्याचं प्रमाण 35 टक्क्यांनी कमी झालं आहे.
2015 साली नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात 184 केसेस एसीबीकडे नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र 2016 मध्ये नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यात 120 केसेस दाखल झाल्या. म्हणजे 35 टक्क्यांनी भ्रष्टाचार कमी झाला आहे.
दरम्यान दरवर्षीप्रमाणे राज्याच्या महसूल खात्यात यावर्षीही सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर भ्रष्टाचारामध्ये एमएमआरडीए, पोलीस, पंचायत समिती, मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा क्रमांक लागतो.
लाचलुचपत खात्याने 2016 मध्ये तब्बल 223 अधिकाऱ्यांविरोधात, 224 पोलिसांविरोधात, 109 पंचायत समिती अधिकारी, एमएमआरडीएचे 52 अधिकारी, मुंबई महापालिकेचे 50 आणि मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या 49 अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यात पुण्यामध्ये भ्रष्टाचाराचे सर्वाधिक 186 प्रकरणं समोर आली आहेत. त्यानंतर नाशिक 153, नागपूर 137, ठाणे 124, औरंगाबाद 116, अमरावती 110 आणि नांदेडमध्ये 104 भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवण्यात आलेत. तर मुंबईमध्ये सर्वात कमी 66 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून लाच घेण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जातो. ते स्वतः पैसे स्वीकारत नाहीत, तर मध्यस्थीमार्फत पैसे घेतात, असं समोर आल्याचं एसीबीने सांगितलं.