सेन्चुरियन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 35 वं शतक झळकावून, सेन्चुरियनच्या सहाव्या वन डेत टीम इंडियाला आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने या वन डेसह सहा सामन्यांची मालिका 5-1 अशी जिंकली.


विराट कोहली वन डे इतिहासात पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 500 पेक्षा अधिक धावा केल्या. या अगोदर हा विक्रम टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर होता. विराटने या सहा सामन्यांमध्ये 558 धावा केल्या.

रोहित शर्माने 2013-14 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 491 धावा केल्या होत्या. हा विक्रम विराट कोहलीने मोडित काढला. विराटने डर्बनमध्ये नाबाद 112, केपटाऊनमधील तिसऱ्या सामन्यात नाबाद 160 आणि सहाव्या सामन्यातही नाबाद 129 धावांची खेळी केली. तर पोर्ट एलिझाबेथमधील वन डेत अर्धशतकी खेळी केली होती.

याशिवाय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये 9500 धावाही पूर्ण केल्या.

दक्षिण आफ्रिकेत 25 वर्षांनी पहिला मालिका विजय

  • भारताला 1992-93 साली सात वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-5 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2006-07 साली चार वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-4 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2013-14 साली तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 5-1 ने विजय