कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.


दिनेश कार्तिकच्या या विजयी खेळीने मुंबईकर शार्दूल ठाकूरने घेतलेला एक अप्रतिम झेल झाकोळला गेला. सोशल मीडियावर या झेलचं मोठं कौतुक करण्यात आलं. मात्र सामन्यानंतर चर्चा झाली ती, फक्त दिनेश कार्तिकच्या षटकाराची. शार्दूलनेही महत्त्वाच्या फलंदाजाचा झेल घेत उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली.

शार्दूल ठाकूरने तमीम इक्बालचा सीमारेषेवर अफलातून झेल पकडला. चहलच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तमीम इकबालने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र शार्दूल ठाकूरच्या चपळाईमुळे भारताला दुसरी विकेट मिळाली. यावेळी तमीम इक्बाल 12 चेंडूंमध्ये 15 धावांवर खेळत होता.

शार्दूलने या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेविरुद्ध एका षटकात 27 धावा दिल्या होत्या. त्यानंतर तो टीकेचा धनी झाला. मात्र पुढच्याच सामन्यातून कमबॅक करत त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

पाहा व्हिडीओ :