मुंबई : चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर षटकारांची आतषबाजी करत होता, त्याच वेळी धोनीच्या लाडक्या लेकीला म्हणजे झिवाला वडिलांच्या भेटीची ओढ लागली होती. झिवाची ही गोंडस इच्छा कॅमेराने टिपली आहे.


धोनीने सहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 79 धावांची खेळी उभारुनही चेन्नई सुपरकिंग्सला रविवारच्या आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबकडून चार धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. धोनीची ही टोलेबाजी सुरु असतानाच झिवाला आपल्या पित्याला भेटावंसं आणि त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटत होती.

झिवाने तिची आई साक्षी आणि धोनी कुटुंबीयांच्या मित्राकडे आपल्या लाडक्या पापाला मैदानातून घेऊन येण्याचा हट्ट धरला होता. 'पापा को बुलाओ' अशी मागणी झिवा करत होती. आपण वडिलांना कशी मिठी मारणार, हेही ती सांगताना व्हिडिओत दिसते.

झिवाने धरलेल्या या लाडिक हट्टाचा व्हिडिओ धोनीने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर झिवाचा व्हिडिओ चाहत्यांची पसंती मिळवत आहे.