इंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपलं नाव कोरलं. अक्षय वाखरे आणि आदित्य सरवटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांत गुंडाळला.
दिल्लीकडून मिळालेलं 29 धावांचं सोपं लक्ष्य विदर्भाने एका विकेटच्या बदल्यात पार केलं. विदर्भाकडून दुसऱ्या डावात अक्षय वाखरेने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर आदित्य सरवटेने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. रजनीश गुरबानीने दोन तर आदित्य सरवटे आणि सिद्धेश नेरळने प्रत्येकी एक विकेट घेतली.
रणजी करंडकाच्या 84 वर्षांच्या इतिहासात विदर्भाने रणजी करंडक जिंकण्याची ही वेळ आहे. विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.
विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघाचे प्रशिक्षक आहेत.
रजनीश गुरबानीची हॅटट्रिक
विदर्भाचा मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानीने दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 1973 साली रणजी करंडकाच्या फायनलमध्ये तामिळनाडूच्या बी कल्याणसुंदरमने मुंबईविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती. रजनीशने दिल्लीच्या विकास मिश्रा, नवदीप सैनी आणि ध्रुव शोरे या फलंदाजंना माघारी धाडत हॅटट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे रजनीशने आपल्या हॅटट्रिकमध्ये तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत केलं. रजनीश गुरबानीने पहिल्या डावात हॅटट्रिकसह एकूण सहा विकेट्स घेतल्या. त्यामुळे विदर्भाने दिल्लीला 295 धावांत रोखलं.