मुंबई : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानची अभिनेत्री वीणा मलिक या दोघी ट्विटरवर भिडल्या. मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची आई नाही. तसंच माझ्या मुलाची काळजी कशी घ्यावी ही तुझा किंवा इतरांच्या चिंतेचा विषय नाही, असं सानिया मिर्झा म्हणाली.

पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवासाठी शोएब मलिकच्या वाईट कामगिरीला जबाबदार ठरवणाऱ्या ट्रोलर्सना उत्तर देणं थांबत नाही, तोच अभिनेत्री वीणा मलिकनेही सानियावर निशाणा साधला. सानिया मिर्झा पती शोएब आणि मुलासोबत एका जंक फूड असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन वीणाने सानियावर टीका केली.

सानिया, तुझ्या बाळाची मला काळजी वाटते. तुम्ही त्याला शीशा पॅलेसमध्ये घेऊन गेला होता, हे त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक नाही का? माझा माहितीप्रमाणए आर्चीज केवळ जंक फूडसाठी ओळखलं जातं. तिथे जाणं अॅथलीट आणि मुलांसाठी योग्य नाही. तुला हे माहिती हवं, कारण तू एक आई पण आहेस आणि अॅथलीटही," असं ट्वीट विणाने केलं होतं.


मग काय, विणाच्या या ट्वीटमुळे सानियाच्या संतापाचा पारा चढला. बाळाच्या पालनपोषणावरुन प्रश्न उपस्थित करणं सानियाला सहन झालं नाही आणि तिने तिखट टिप्पणी करताना लिहिलं की, "वीणा, मी माझ्या बाळाला शीशा पॅलेस घेऊन गेली नव्हती. यासाठी तुला किंवा जगाला काळजी करण्याची गरज नाही. कारण मला वाटतं की, इतरांच्या तुलनेत मी माझ्या मुलाची चांगली काळजी घेते. दुसरी गोष्ट अशी की, मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची ना डाएटिशियन आहे, ना त्यांची आई, किंवा प्राध्यापक आणि शिक्षकही नाही.


सानिया मिर्झाच्या या उत्तरानंतर वीणा मलिक म्हणाली की, "बाळ तुमच्यासोबत नव्हतं, हे समजल्याने आनंद झाला. तू पाकिस्तानी संघाची डाएटेशियन किंवा आई आहेस, असं मी म्हटलं होतं का? मी म्हणाले होते की, तू अॅथलीट आहे, फिटनेस किती महत्त्वाचं आहे हे तुला माहित नाही का? तू क्रिकेटरची पत्नी नाहीस का? तुला पतीच्या आरोग्याची काळजी करायला हवी. मी काही चुकीचं बोलतेय का?

सानियाने वीणा मलिकवर आणखी एक ट्वीट केलं, परंतु तिने नंतर ते डिलीट केलं. पण तोपर्यंत नेटीझन्सनी त्या ट्वीटचं स्क्रीन शॉट घेतला होता. सानियाच्या डिलीट ट्वीटचा स्क्रीन शॉट वीणानेही शेअर केला.

या ट्वीटमध्ये सानियाने म्हटलं होतं की, "कधी झोपायचं, कधी उठायचं, काय खायचं हे आम्हाला माहित आहेत. सर्वात महत्त्वाची आणि काळजीची बाब म्हणजे मासिकांच्या कव्हर पेजसाठी तू जे केलं, ते बालकांसाठी योग्य नाही. तुला माहित नाही का ते धोकादायक आहे. पण लेकिन आमची काळजी करण्यासाठी खूप आभार."


यानंतर वीणाने आणखी एक ट्वीट केलं. थोडी हिंमत दाखव आणि ट्वीट डिलीट करु नको. सुदैवाने तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंय की लोक आपलं कृत्य नाकारु शकत नाही. ज्या मासिकाच्या कव्हर पेजचा तू उल्लेख केला, ते मॉर्फ्ड होत. मी तुझे सर्व वाद पुन्हा उकरुन काढू शकते. पण मला विषयांतर करायचं नाही.


व्हायरल व्हिडीओचा दावा
व्हायरल व्हिडीओमधून दावा केला जात होता की, मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळवलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी शोएब मलिकसह पाकिस्तानी खेळाडू रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्यांना आपल्या फिटनेसची अजिबात काळजी नाही, असं म्हटलं जात होतं. तर  भारताविरुद्धच्या सामन्यात शोएब शून्यावर बाद झाला. यानंतर काहींनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला.

मात्र खेळाडू शुक्रवारी रात्री रेस्टॉरंटमध्ये गेले होते, शनिवारी नाही, असं स्पष्टीकरण पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने दिलं होतं. परवानगीशिवाय व्हिडीओ बनवून तो शेअर केल्याने सानिया मिर्झाने संताप व्यक्त केला होता.

पाकिस्तानात सानिया ट्रेण्डिंगमध्ये
मात्र सानिया मिर्झा आणि वीण मलिक यांच्या ट्विटरवर झालेल्या या वादाचा नेटीझन्स मज्जा लुटत होते आणि ते ही यात सामील झाले. पाकिस्तानमध्ये याला अतिशय महत्त्व दिलं जात आहे. पाकिस्तानात तर सानिया मिर्झा ट्रेण्ड करत होती.