US Open 2021 : यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररच्या वापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. रॉजर फेडररनं यंदाच्य यूएस ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रॉजर फेडरर सध्या गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. उजव्या गुडघ्यावर करण्यात आलेल्या तिसऱ्या शस्त्रक्रियेमुळं रॉजर यूएस ओपनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. एवढंच नाहीतर आता रॉजर फेडररच्या टेनिस कोर्टवर परतण्याची अपेक्षा फारच कमी आहे. 


रॉजर फेडररनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ मेसेज शेअर केला आहे. याच व्हिडीओतून रॉजर फेडररनं यूएस ओपनमधून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. रॉजर आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे की, "मी अनेक डॉक्टरांकडून सल्ला घेतला. ग्रासकोर्ट सत्र आणि विम्बल्डन दरम्यान माझ्या गुडघ्याचं दुखणं आणखी वाढलं. त्यांनी मला आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं सांगितलं. मी सुद्धा त्यांचा सल्ला मानण्याचं ठरवलं. त्यामुळे मला काही महिने टेनिस कोर्टपासून दूर राहावं लागेल."



वीस वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडररनं काही दिवसांपूर्वीच आपल्या वयाची चाळीशी पूर्ण केली आहे. रॉजल फेडररला विम्बल्डन 2021 च्या क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 40 वर्षांच्या रॉजर फेडररनं 2008च्या ऑलिम्पिकमध्ये डबल्स इव्हेंटमध्ये स्टेन वावरिकासोबत गोल्ड मेडल जिंकलं होतं. परंतु, सिंगल्समध्ये क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रॉजर फायनल्समध्ये ब्रिटनच्या एंडी मरेकडून पराभूत होत सिल्वर मेडलवर आपलं नाव कोरलं होतं. 


विम्बल्डन 2021 मध्ये ग्रँडस्लॅम जेतेपदाचं रॉजरचं स्वप्न भंगलं


विम्बल्डन 2021 मध्ये टेनिस स्टार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पुरुष एकेरी खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने फेडररचा 6-3, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. फेडरचा पराभव करुन हुर्काझने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पुढच्या महिन्यात वयाची चाळीशी गाठणारा फेडरर 21वा ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न घेऊनच मैदानावर उतरला होता. परंतु, संपूर्ण सामन्यात हुर्काझचंच वर्चस्व दिसून येत होतं. या पराभवामुळे रॉजर फेडरचे ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. सामन्यात पराभव होऊनही चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात रॉजरनं मानाचं स्थान पटकावल्याचा प्रत्यय कालच्या या सामन्यात आला. तसेच सोशल मीडियावरही चाहत्यांकडून फेडरर सामना हरल्याबाबत हळहळ व्यक्त होत होती. विम्बल्डनमधील शेवटचा सामना खेळल्याचे संकेत रॉजरनं दिल्याची शंका चाहत्यांकडून उपस्थित केली जात आहे. अशातच सामन्यासाठी सेंटर कोर्टवर उपस्थित असलेल्या चाहत्यांकडून फेडररच्या पराभवाबाबत हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही होत होता. सामना संपल्यानंतर कोर्टवर उपस्थित असलेल्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात फेडरर बाहेर पडला.