leonel Messi India Tour: साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या लिओनेल मेस्सीच्या फुटबॉल कॉन्सर्टचे मुख्य आयोजक सताद्रु दत्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा झाल्यानंतर, अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार लिओनेल मेस्सीला कार्यक्रमाचे ठिकाण सोडून लवकर परतण्यास भाग पाडल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. कार्यक्रमाच्या गैरव्यवस्थापनाच्या आरोपाखाली दत्ता यांना कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली, जिथे ते मेस्सी आणि इतरांना हैदराबादला जाण्यासाठी निरोप देण्यासाठी गेला होते. पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कुमार यांनी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. प्रेक्षकांना त्यांचे तिकीट परत मिळावेत असेही त्यांनी सांगितले.
स्टेडियममध्ये गोंधळ का?
संपूर्ण कोलकाता मेस्सीच्या स्वागतात मग्न होता. पण जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसे परिस्थिती बदलत गेली. साल्ट लेक स्टेडियमवर अभूतपूर्व गोंधळ उडाला. तिकिटे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करूनही, अनेक चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला पाहू शकले नाहीत. मेस्सी देखील नियोजित वेळेपूर्वी मैदान सोडून गेला. यामुळे मेस्सीच्या चाहत्यांचा संताप वाढला आणि स्टेडियम युद्धभूमी बनले. बाटल्या फेकण्यात आल्या, खुर्च्या फेकण्यात आल्या आणि शेकडो लोक कुंपण तोडून मैदानात घुसले. स्टेडियमला आगही लावली. पोलिसांनी लाठीमार केला, पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही. सुरक्षा कर्मचारी असहाय्य दिसत होते. अखेर मुख्य आयोजक सतद्रु दत्ता यांना अटक केल्याने चाहत्यांचा राग काहीसा कमी झाला आहे.
पोलिस महासंचालकांची पत्रकार परिषद
या घटनेनंतर राज्य पोलिस महासंचालक राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत एडीजी कायदा आणि सुव्यवस्था जावेद शमीम होते. राजीव कुमार म्हणाले की सरकारने चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे आणि आयोजकांकडून लेखी उत्तर मागितले आहे. त्यांनी विकलेल्या तिकिटांचे पैसे परत करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. मेस्सी पाहता न आल्याने संतापाची लाट पसरली. मुख्य आयोजकाला ताब्यात घेण्यात आले आहे; कोणालाही सोडले जाणार नाही. जावेद शमीम म्हणाले की एफआयआर दाखल केला जात आहे. आयोजकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांनी पुढे सांगितले की तपासानंतरच दोषी निश्चित केले जातील, ज्याला थोडा वेळ लागेल. फसवणूक झालेल्या आणि संतप्त झालेल्या मेस्सी चाहत्यांच्या चिंता दूर केल्या जात आहेत.
ममतांनी मेस्सीची माफी मागितली
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे झालेल्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमातील गैरव्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली. या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की त्या साल्ट लेक स्टेडियमवर मेस्सीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होत्या, जिथे हजारो चाहते प्रसिद्ध फुटबॉलपटूची एक झलक पाहण्यासाठी जमले होते. एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "या दुर्दैवी घटनेबद्दल मी लिओनेल मेस्सी, त्यांचे चाहते आणि सर्व क्रीडाप्रेमींची नम्रपणे माफी मागते."
तपास समिती स्थापन
ममता बॅनर्जी म्हणाल्या की त्या न्यायमूर्ती (निवृत्त) असीम कुमार रे यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती स्थापन करत आहेत. गृह विभागाचे मुख्य सचिव आणि पर्वतीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या समितीचे सदस्य असतील. समिती या घटनेची सविस्तर चौकशी करेल, जबाबदारी निश्चित करेल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवेल. ममता म्हणाल्या, "पुन्हा एकदा, मी सर्व क्रीडाप्रेमींची मनापासून माफी मागते."
इतर महत्वाच्या बातम्या