वेलिंग्टन: पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारताने पापुआ न्यू गिनियाविरुद्धचा सामना तब्बल 10 विकेट्स राखून जिंकला. भारताचा हा दुसरा विजय आहे.
आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पापुआ न्यू गिनिया अर्थात पीएनजीला अवघ्या 64 धावांत गुंडाळलं.
मग विजयासाठी सोपं लक्ष्य घेऊन उतरलेला भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा यांनी अवघ्या 8 षटकात 67 धावा केल्या.
महत्त्वाचं म्हणजे भारताला विजयासाठी 65 धावांची गरज असताना, एकट्या पृथ्वी शॉने 39 चेंडूत तब्बल नाबाद 57 धावा केल्या. यामध्ये त्याने तब्बल 12 चौकार ठोकले. मनज्योत 9 धावा करुन नाबाद राहिला.
त्याआधी अंकुल रॉयच्या फिरकीसमोर पीएनजीच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. अंकुलने 6.5 षटकात 14 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी अंकुलला सामनावीराचा किताब देण्यात आला.
याशिवाय भारताचा वेगवान तोफखाना सांभाळणाऱ्या शिवम मावीने 2 तर कमलेश नागरकोटीने 1 विकेट घेतली.
शिवम आणि कमलेश यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तब्बल 145 च्या वेगाने गोलंदाजी केली होती. त्यामुळे या जोडगोळीने भारतीय क्रीडा वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाला तब्बल 100 धावांनी हरवून विश्वचषकात विजयी सलामी दिली होती.