अंडर-19 भारतीय संघाचं मुंबईत जंगी स्वागत
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2018 11:34 PM (IST)
न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियाचं मुंबईत आगमन झालं.
मुंबई : विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या अंडर-19 टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियाचं मुंबईत आगमन झालं. मुंबई विमानतळावर भारताच्या या युवा शिलेदारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी पृथ्वी शॉचं हार घालून आणि पेढा भरवून स्वागत करण्यात आलं. भारतीय अंडर-19 संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. या विजयासह भारताने चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याआधी मोहम्मद कैफ, विराट कोहली आणि उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक पटकावला होता. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि पृथ्वी शॉ यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. खेळातील सातत्य राखत विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा अनुभव कसा होता, याचं उत्तरही पृथ्वी शॉने दिलं.