जयपूर : राजस्थानविरुद्धच्या कालच्या (रविवार) सामन्यात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या फलंदाजीवर साऱ्यांच्याच नजरा लागून होत्या. याचवेळी पांड्याच्या एका फटक्याने साऱ्यांच्याच काळजात धस्स झालं. कारण की, पांड्याने मारलेला एक जोरदार थेट पंचांच्या बाजूने गेला.


कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लुईस शून्यावर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी 130 धावांची भागीदारी केली. पण जोफ्रा आर्चर आणि धवल कुलकर्णी यांनी मुंबईच्या झटपट विकेट काढत त्यांना बॅकफूटवर ढकललं.

यावेळी 19व्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पांड्यावर धावा करण्याचा दबाव होता. त्यासाठी त्याने आर्चरवर हल्ला चढवला. आर्चरच्या एका वेगवान चेंडूवर पांड्याने सरळ फटका मारला. पण हा फटका एवढ्या जोरदार होता की, पापणी लवते न लवते तोच चेंडू समोर उभ्या असलेल्या पंचांच्या बाजूने गेला. यावेळी पंचांनी देखील थेट मैदानावरच झेप घेतली. सुदैवाने पंचांना कोणतीही दुखापत झाली नाही. जर हा चेंडू पंचांना लागला असता तर त्यांना मोठी दुखापत होण्याची शक्यता होती. पंच वेळीच खाली वाकल्याने चेंडू थेट सीमापार गेला आणि पांड्याला चार धावाही मिळाल्या.

दरम्यान, कृष्णप्पा गौतमच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात संजू सॅमसन आणि वेब स्टोक्स यांची भागीदारीही मोलाची ठरली. पण 11 चेंडूत 33 धावा फटकावणारा गौतम हा या सामन्याचा हिरो ठरला.

VIDEO :