कराची : पाकिस्तान क्रिकेट संघातील पाच खेळाडू चौकशीच्या कचाट्यात सापडले आहेत. नॅशनल वन डे कप स्पर्धा सुरु असताना कथितरित्या धक्काबुक्की आणि गैरवर्तणुकीमुळे या खेळाडूंची क्रिकेट बोर्ड चौकशी करणार आहेत.
उमर अकमल, मोहम्मद नवाज, बिलावल भट्टी, ओवेस जिया आणि शाहिद युसूफ एका स्थानिक थिएटमध्ये डान्स शो आणि नाटक पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्यानंतर तिथे धक्काबुक्कीची घटना घडली. हा प्रकार टीव्हीवर दाखवल्यानंतर संबंधित घटना समोर आली.
टीव्ही चॅनलच्या फुटेजनुसार, उमर अकमल थिएटरमध्ये काही लोकांसोबत बाचाबाची करत आहे आणि त्यानंतर लोकांकडे रागाने पाहिलं. महिला डान्सर्सनी पुन्हा डान्स करण्याची फर्माइश काही खेळाडूंनी केली. त्यानंतर थिएटरमधील प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये वाद झाला.
मात्र उमरने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. तो म्हणाला की, मीडियाने क्रिकेटमधील माझ्या कामगिरीबाबत लिहावं, पण माझ्या खासगी किंवा सामाजिक आयुष्याबाबत लिहिण्याचा अधिकार नाही. हे चुकीचं आहे, असं उमर अकमल म्हणाला. याशिवाय क्रिकेट बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत असल्याच्या वृत्ताचाही त्याने इन्कार केला आहे.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोप सिद्ध झाल्यास पाचही खेळाडूंवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.