नवी दिल्ली: अनूप कुमारच्या यू मुम्बाचं प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या मोसमातलं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. खरं तर मनजीत चिल्लरच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटणनं बंगळुरू बुल्सचा 36-33 असा धुव्वा उडवल्यानं यू मुम्बासाठी उपांत्य फेरीची वाट आणखी खडतर बनली होती.
यू मुम्बाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दबंग दिल्लीवर किमान 45 गुणांनी विजय आवश्यक होता. पण यू मुम्बाला दिल्लीवर 38-34 असा विजय मिळवता आला. त्यामुळं गुणतालिकेत मुंबई आणि पुण्याच्या टीम्सच्या खात्यात सम-समान म्हणजे प्रत्येकी 42 गुणच जमा झाले.
गुणातील फरकाच्या आधारे, पुण्याला चौथं स्थान मिळालं तर यू मुम्बाला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. आता 29 जुलैला प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत पुणेरी पलटणला पटना पायरेट्सचा सामना करायचा आहे तर तेलुगू टायटन्ससमोर जयपूर पिंक पँथर्सचं आव्हान असेल.