अंडर-17 फिफा विश्वचषकात अमेरिकेकडून भारताचा धुव्वा
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2017 11:36 PM (IST)
भारताच्या दृष्टीनं नामुष्कीची बाब म्हणजे या सामन्यात भारताला एकही गोल झळकावता आला नाही.
(AP Photo/Tsering Topgyal)
नवी दिल्ली : भारताला अंडर-17 फिफा विश्वचषकातल्या पदार्पणात अमेरिकेकडून तीन गोल्सच्या फरकानं पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताच्या दृष्टीनं नामुष्कीची बाब म्हणजे या सामन्यात भारताला एकही गोल झळकावता आला नाही. अमेरिकेचा कर्णधार जोस सार्जंटनं तिसाव्या मिनिटाला अमेरिकेचं खातं उघडलं. मग डर्किननं ५१व्या मिनिटाला दुसरा, तर कार्लटननं ८४व्या मिनिटाला तिसरा गोल डागून अमेरिकेला ३-० असा मोठा विजय मिळवून दिला. या विश्वचषकातल्या ‘अ’ गटात भारत आणि अमेरिकेसह कोलंबिया आणि घाना संघांचा समावेश आहे. त्यामुळं विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक मारायची, तर भारताला कोलंबिया आणि घानाला हरवण्याचा पराक्रम गाजवावा लागेल.