अंतिम सामन्यात रोहित शर्मा 13 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 56 धावांवर बाद झाला. त्यावेळी टीम इंडियाला विजयासाठी 6.4 षटकांमध्ये 70 धावांची गरज होती. मात्र संघ व्यवस्थापनाने सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेत दिनेश कार्तिकऐवजी विजय शंकरला फलंदाजीसाठी पाठवलं. विजय शंकरची फलंदाजीची मालिकेतली ही पहिलीच वेळ होती.
अखेरच्या तीन षटकांमध्ये भारताला विजयासाठी 35 धावांची गरज होती, तेव्हा या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं. विजय शंकरने मुस्ताफिजुर रहमानच्या 17 व्या षटकात 5 चेंडूत केवळ एकच धाव काढली. एवढंच नाही, तर याच षटकात मनीष पांडेही बाद झाला. त्यावेळी भारताला 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज होती. त्यामुळे हा सामना भारताच्या जवळपास हातातून गेल्यात जमा होता. मात्र दिनेश कार्तिकने 19 व्या षटकात 22 धावा करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
अगदी त्याचप्रमाणे दिनेश कार्तिकने रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरवला आणि अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत विजय खेचून आणला. रोहित शर्मासाठी हा क्षण सर्वात अविस्मरणीय होता. याचवेळी मैदानात एक असा प्रसंग आला, जो रोहित शर्मासाठी अत्यंत आनंद देणारा होता.
भारताच्या विजयानंतर श्रीलंकेच्या चाहत्यांनीही जोरदार सेलिब्रेशन केलं. भारतीय चाहत्यांनी आणि श्रीलंकन चाहत्यांनी भारताच्या विजयानंतर जल्लोष केला. या क्षणाचा फोटो शेअर करत, हा माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षण होता, असं रोहित शर्मा म्हणाला.
भारतातील क्रिकेटचे प्रसिद्ध चाहते सुधीर आणि श्रीलंकन चाहता मैदानात सेलिब्रेशन करतानाचा फोटो रोहित शर्माने शेअर केला.