मुंबई : टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज सिंग आणि अभिनेत्री, मॉडेल हेझल कीच गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर युवराज-हेझलकडे गोड बातमी असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र हेझलना या सगळ्या अफवा उडवून लावल्या आहेत.

लग्नानंतर हेझलकडे फॅमिली प्लॅनिंगबाबत विचारणा करण्यात येत होती. याचा कळस म्हणजे विमानतळावर हेझल लूज फीटिंगच्या कपड्यांमध्ये दिसल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही गॉसिपप्रेमींनी तर थेट हेझल प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु केल्या. हेझलने मात्र या अफवा उडवून लावल्या आहेत.

'नाही, मी प्रेग्नंट नाही. फॅमिली प्लॅनिंगबाबत आमचा अद्याप काहीही विचार नाही. जसं आमचं लग्न झालं, तशी माझी प्रेग्नंसी योग्य वेळी होईल. शेवटी ते नशिबावर आहे. मी गर्भवती असेन, तर तो (युवराज) जवळपास असेल का? त्याला तर खूप प्रवास करावा लागतो.' असं 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत हेझल म्हणाली.

'आम्ही सध्या आनंदात आहोत. तुम्हाला तर माहितच असेल तो किती बिझी असतो. लग्नानंतर फार कमी वेळ एकत्र घालवला आहे. पण आमच्यातलं नातं बदललेलं नाही. आमचं नातं अत्यंत पारदर्शी आहे.' असंही हेझल उत्साहाने सांगते.

2015 साली बालीमध्ये युवराज-हेझलचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये चंदिगढ, गोवा आणि दिल्लीत त्यांचा विवाह सोहळा झाला. विराट-अनुष्कासह टीम इंडियातील सर्वच क्रिकेटपटूंनी लग्नाला हजेरी लावली होती.