नॉटिंगहॅम : विराट कोहलीच्या टीम इंडियाने नाटिंगहॅम कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत भारताने पहिल्या डावात 168 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद 124 धावांची मजल मारली. भारताकडे एकूण 292 धावांची आघाडी झाली आहे.


शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी सलामीच्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. धवनने 44 धावांचं योगदान दिलं. लोकेश राहुलने 36 धावांची खेळी उभारली. त्यामुळे भारताची एकूण आघाडी आता 292 इतकी झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 33, तर कर्णधार विराट कोहली आठ धावांवर खेळत होते.

पंड्याच्या पाच विकेट

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाच विकेट घेत इंग्लंडच्या डावाचं कंबरडं मोडलं. पंड्याच्या पाच, इशांत शर्मा आणि बुमरा यांच्या प्रत्येकी दोन विकेटमुळे इंग्लंडचा पहिला डाव 161 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात 168 धावांची आघाडी मिळाली.

ऋषभ पंतचा विक्रम

आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ऋषभ पंतने मात्र या सामन्यात कमाल केली. त्याने यष्टिरक्षक म्हणून पाच झेल घेतले, जो एक विश्वविक्रम आहे. पदार्पणाच्या सामन्यात एकाच डावात पाच झेल घेणारा तो आशियातील पहिलाच यष्टिरक्षक ठरला.

यापूर्वीही फलंदाजीमध्ये त्याने कमाल केली होती. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत खातं उघडणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर यष्टिरक्षण करतानाही त्याच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला.

ऋषभने दोन झेल इशांत शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर घेतले, तर एक झेल जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर घेतला.