नॉटिंगहॅम : विराट कोहलीने नॉटिंगहॅम कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी उभारून टीम इंडियाचा डाव सावरला. टीम इंडियाच्या कर्णधाराने अजिंक्य रहाणेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 159 धावांची भक्कम भागीदारी रचली. त्यामुळे भारताला पहिल्या दिवसअखेर सहा बाद 307 धावांची मजल मारता आली.


त्याआधी या कसोटीत शिखर धवन आणि लोकेश राहुलने 60 धावांची सलामी दिली होती. पण ख्रिस वोक्सने धवन, राहुल आणि चेतेश्वर पुजाराला माघारी धाडून टीम इंडियाची तीन बाद 82 अशी केविलवाणी अवस्था केली.

विराट आणि अजिंक्यच्या भागीदारीने भारतीय संघाला त्या संकटातून बाहेर काढलं. पण भारतीय कर्णधाराचं शतक तीन धावांनी हुकलं. आदिल रशिदच्या उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात विराटने पहिल्या स्लीपमध्ये बेन स्टोक्सच्या हाती झेल दिला. त्याने 152 चेंडूंत अकरा चौकारांसह 97 धावांची खेळी उभारली.

अजिंक्य रहाणेला अखेर सूर गवसला

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अखेर सूर गवसला. त्याने नॉटिंगहॅम कसोटीत आपल्या भात्यातले फटके काढून लौकिकाला साजेशी खेळी उभारली. या खेळीत त्याने मानसिक ओझं झुगारून फलंदाजी केल्याचं दिसलं. अजिंक्यने 131 चेंडूंत 12 चौकारांसह 81 धावांची खेळी उभारली. त्याने आपल्या कर्णधाराला दिलेली दमदार साथ भारताच्या डावाच्या उभारणीत मोलाची ठरली.

ऋषभ पंतने आपल्या पहिल्याच सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. सध्या तो 22 धावांवर खेळत आहे. 23 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 75 षटकार आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याने दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम केला.