टोकियो : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले की, पुढच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकसाठी सहभागी होणारे खेळाडू कोचिंग स्टाफ आणि चाहत्यांना लसी देण्याची आवश्यकता असू शकते. जेणेकरुन जपानमधील लोकांचे संरक्षण होऊ शकेल. जपानचे नवीन पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर बाक यांनी हे सांगितले. सुगा यांच्यासोबत झालेली बाक यांची ही पहिली भेट होती. ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी पार पडणार होती. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. जवळपास आठ महिन्यांपूर्वी स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बाक यांचा हा पहिला जपान दौरा आहे.
पुढे बाक म्हणाले की, जपानमधील लोकांच्या संरक्षणासाठी आणि जपानमधील लोकांचा आदर राखण्यासाठी, लस उपलब्ध झाल्यास ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या आणि येथे येणाऱ्या सर्वांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी आयओसी सर्वतोपरी प्रयत्न करेल. पुढील वर्षी ऑलिम्पिक स्टेडियमवर आम्ही प्रेक्षकांचे आयोजन करू शकू आणि प्रेक्षक सुरक्षित वातावरणाचा आनंद लुटू शकतील, हे आमचं सर्वांनाआश्वासन आहे.
बाक सलग दोन बैठका घेणार आहेत आणि टोकियो ऑलिम्पिकचे आयोजक, राजकारणी यांच्यासोबत फोटो घेतील. जपानी लोकांना आश्वस्त करावे लागेल की कोरोना साथीच्या काळात ऑलिम्पिक सुरक्षितरित्या पार पाडल जाईल. ऑलिम्पिकची सुरुवात 23 जुलै 2021 रोजी होणार आहे.