नवी दिल्ली : मेरी कोमने राष्ट्रीय बॉक्सिंग निवड चाचणीच्या अंतिम फेरीत निखात झरीनचा 9-1 असा धुव्वा उडवून, आपलं श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. 51 किलो वजनी गटात झालेल्या अंतिम लढतीकडे भारतीय बॉक्सिंगरसिकांचं लक्ष लागलं होतं. या लढतीत मेरी कोमनं निखात झरीनचं आव्हान उधळून लावलं आहे. या विजयासह मेरी कोमने पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्लालिफार्सच्या टीममध्ये प्रवेश मिळवला आहे.
मेरी कोमनं आजवरच्या कारकीर्दीत सहावेळा विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. तिच्या खजिन्यात लंडन ऑलिम्पिकचं कांस्यपदकही आहे. पण त्याच मेरी कोमला यंदा विश्वचषकाच्या निमित्तानं निवड चाचणीत झुकतं माप देण्यात आलं, असा आरोप निखात झरीननं केला होता.
टोकियो ऑलिम्पिकच्या राष्ट्रीय निवड चाचणीत आपल्याला पुरेशी संधी देण्यात, यावी अशी लेखी मागणी निखात झरीनने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या मेरी कोम आणि निखात झरीन यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याकडे देशाचे लक्ष लागले होते. परंतु निखातचा दारुण पराभव करत भारताच्या सुपरमॉमने आपणच श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले आहे.
दुसऱ्या बाजूला महिलांच्या 57 किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत दोन वेळा रौप्य पदक जिंकणाऱ्या सोनिया लाथरला साक्षी चौधरीने पराभवाची धूळ चारली आहे. सोनिया साक्षीच्या पंचेसचा मुकाबला करु शकली नाही.
दरम्यान, सामना जिंकल्यानंतर मेरीने निखातसोबत हात मिळवला नाही. दोन्ही खेळाडू एकमेकींकडे रागाने बघत आपआपल्या जागी परतल्या. याबाबत मेरीला विचारले असता, मेरी म्हणाली की, मला निखातचं वागण बिलकुल आवडलं नाही. मी तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिने मला मिठी मारली नाही. ती वयाने आणि कारकिर्दीने माझ्यापेक्षा लहान आहे, आम्ही वरिष्ठ खेळाडू नव्या खेळाडूंकडून केवळ थोड्या आदराची अपेक्षा करतो. परंतु तिने मला साधी मिठी मारणंसुद्धा पसंत केलं नाही. मला त्याचं खूप वाईट वाटलं.
व्हिडीओ पाहा