Tokyo Olympic 2020 : टेनिस स्टार रॉजर फेडररनं टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार नसल्याचं रॉजर फेडररनं जाहीर केलं आहे. 20 ग्रँड स्लॅम आपल्या नावे करणाऱ्या फेडरर सध्या गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. त्यामुळेच रॉजर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही. रॉजर फेडररला यापूर्वीही गुडघ्याच्या दुखण्यामुळे 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आलं नव्हतं. तसेच सर्बियाचा जगातील नंबर वनचा टेनिसपटू नोवाक जोकोविचचंही ऑलिम्पिकमध्ये खेळणं निश्चित नाही. 


रॉजर फेडररनं ऑलिम्पिकमध्ये सहाभागी होणार नसल्याचं जाहीर करताना म्हटलं आहे की, "विम्बल्डन स्पर्धेदरम्यान मला गुडघ्याचं दुखणं सुरु झालं आणि मी स्विकारलं की, मला टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली पाहिजे." 



फेडरर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नसल्यामुळं निराश आहे. याबाबत बोलताना रॉजर म्हणाला की, "मी खरंच खूप निराश आहे. कारण जेव्हाही मी स्वित्झर्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे, हे माझ्या कारकिर्दीतील सन्मान आणि मुख्य आकर्षण राहिलं आहे. मी या उन्हाळ्याच्या शेवटी परतण्याच्या दृष्टीकोनातून आधीच क्वॉरंटाईन सुरु केलं आहे. मी संपूर्ण स्विस संघाला शुभेच्छा देतो." 


रॉजल फेडररला रविवारी संपलेल्या विम्बल्डन 2021 च्या क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 39 वर्षाच्या रॉजर फेडररनं 2008च्या ऑलिम्पिकमध्ये डबल्स इव्हेंटमध्ये स्टेन वावरिकासोबत गोल्ड मेडल जिंकलं होतं. परंतु, सिंगल्समध्ये क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रॉजर फायनल्समध्ये ब्रिटनच्या एंडी मरेकडून पराभूत होत सिल्वर मेडलवर आपलं नाव कोरलं होतं. 


विम्बल्डन 2021 मध्ये ग्रँडस्लॅम जेतेपदाचं रॉजरचं स्वप्न भंगलं


विम्बल्डन 2021 मध्ये टेनिस स्टार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पुरुष एकेरी खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने फेडररचा 6-3, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. फेडरचा पराभव करुन हुर्काझने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पुढच्या महिन्यात वयाची चाळीशी गाठणारा फेडरर 21वा ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न घेऊनच मैदानावर उतरला होता. परंतु, संपूर्ण सामन्यात हुर्काझचंच वर्चस्व दिसून येत होतं. या पराभवामुळे रॉजर फेडरचे ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. सामन्यात पराभव होऊनही चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात रॉजरनं मानाचं स्थान पटकावल्याचा प्रत्यय कालच्या या सामन्यात आला. तसेच सोशल मीडियावरही चाहत्यांकडून फेडरर सामना हरल्याबाबत हळहळ व्यक्त होत होती. विम्बल्डनमधील शेवटचा सामना खेळल्याचे संकेत रॉजरनं दिल्याची शंका चाहत्यांकडून उपस्थित केली जात आहे. अशातच सामन्यासाठी सेंटर कोर्टवर उपस्थित असलेल्या चाहत्यांकडून फेडररच्या पराभवाबाबत हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही होत होता. सामना संपल्यानंतर कोर्टवर उपस्थित असलेल्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात फेडरर बाहेर पडला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :