मुंबई : रणजी करंडक स्पर्धेच्या रणसंग्रामात महाराष्ट्राच्या तीन संघांचे सामने वेगवेगळ्या गटात सुरु आहेत. त्यात मुंबई वि. बडोदा सामन्यात बडोद्याने मुंबईवर आघाडी घेतली, तर महाराष्ट्र संघाने रेल्वेसमोर 481 धावा उभारल्या आणि विदर्भ विरुद्ध बंगाल सामन्यात विदर्भ संघ 410 धावांनी आघाडीवर आहे.
मुंबई वि. बडोदा
सलामीच्या आदित्य वाघमोडेच्या शतकी खेळीनं बडोद्याला मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात 204 धावांची मजबूत आघाडी मिळवून दिली आहे. वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात बडोद्यानं दुसऱ्या दिवसअखेर 4 बाद 376 अशी मजल मारली होती. बडोद्याच्या आदित्य वाघमोडेनं या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं सहावं शतक झळकावलं. त्यानं 13 चौकार आणि एका षटकारासह 138 धावांची खेळी केली. विष्णू सोळंकी, दीपक हुडा आणि स्वप्निल सिंगनं अर्धशतकं झळकावली. मुंबईकडून शार्दूल ठाकूर, रॉयस्टन डायस आणि श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महाराष्ट्र वि. रेल्वे
यष्टिरक्षक रोहित मोटवानीच्या शतकानं महाराष्ट्राला रेल्वेविरुद्धच्या रणजी सामन्यात सर्व बाद 481 धावांची मजल मारुन दिली. हा सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर सुरु आहे. रोहित मोटवानीनं 189 धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 23 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेनंही 92 धावांचं योगदान दिलं. दरम्यान, या सामन्यात रेल्वेनं दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 88 धावा जमवल्या होत्या.
विदर्भ वि. बंगाल
संजय रामस्वामीच्या 182 धावांच्या आणि आदित्य सरवटेच्या 89 धावांच्या खेळीच्या जोरावर विदर्भानं बंगालविरुद्धच्या रणजी सामन्यात सर्व बाद 499 धावांचा डोंगर उभारला. बंगालकडून ईशान पोरेलनं चार तर अशोक डिंडानं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर बंगालनं दुसऱ्या दिवसअखेर तीन 89 धावांची मजल मारली. हा सामना पश्चिम बंगालच्या कल्याणी शहरात सुरू आहे. या सामन्यात बंगालचा संघ अजूनही 410 धावांनी पिछाडीवर आहे. बंगालला फॉलोऑनचा मारा चुकवण्यासाठी आणखी 211 धावांची गरज आहे.
रणजीचा रणसंग्राम : दुसऱ्या दिवसअखेर बडोदा, महाराष्ट्र, विदर्भाचं वर्चस्व
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Nov 2017 10:25 PM (IST)
रणजी करंडक स्पर्धेच्या रणसंग्रामात महाराष्ट्राच्या तीन संघांचे सामने वेगवेगळ्या गटात सुरु आहेत. त्यात मुंबई वि. बडोदा सामन्यात बडोद्याने मुंबईवर आघाडी घेतली, तर महाराष्ट्र संघाने रेल्वेसमोर 481 धावा उभारल्या आणि विदर्भ विरुद्ध बंगाल सामन्यात विदर्भ संघ 410 धावांनी आघाडीवर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -