मुंबई : दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुरक्षेच्या कारणास्तव होमग्राऊंडवरील सामने अचानकपणे रद्द करावे लागले. मात्र महाराष्ट्रातील सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे चेन्नईचे सामने पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हलवण्यात आले आहेत.


तामिळनाडूत कावेरी आंदोलन पेटल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला. होम ग्राऊंडवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सनसनाटी विजय मिळवत चेन्नईने घरच्या मैदानात पुनरागमन साजरं केलं. मात्र या सामन्यादरम्यान मैदानाबाहेर आंदोलकांनी गोंधळ घातला होता.

कावेरी पाणीवाटप लवादाची नियुक्ती करण्यासाठी तामिळनाडूतील राजकीय संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे आयपीएलला सुरक्षा पुरवली जाऊ शकत नाही, असं चेन्नई पोलिसांनी बीसीसीआयला कळवलं. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सर्व सामने दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे हे सीएसकेला होम ग्राऊंड म्हणून देण्यात आलं.

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातही आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला होता. मैदानाच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यानंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली.

सीएसकेचे होम ग्राऊंडवर एकूण सात सामने होणार होते, मात्र आता सुरक्षेच्या कारणामुळे हे सामने पुण्यात खेळवण्यात येतील. दरम्यान, सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं हे यापूर्वीही होम ग्राऊंड होतं. पुणे सुपरजाएंट्सचा कर्णधार म्हणून तो या मैदानावर खेळलेला आहे.

चेन्नईचे पुण्यातील सामने

20 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स

28 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. मुंबई इंडियन्स

30 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स

5 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

13 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद

20 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब

दरम्यान, पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर या आयपीएलमधले एकूण आठ सामने होतील. सीएसकेचे सहा आणि यापूर्वीच ठरलेला पहिला एलिमिनेटर आणि पहिला क्वालिफायर पुण्यात खेळवण्यात येईल, जो 23 आणि 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.