मुंबई: क्रिकेटमधील एखादी खेळी देखील एखाद्या खेळाडूचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. अशा काही खेळी आणि असे खेळाडू नेहमीच क्रिेकेट चाहत्यांच्या लक्षात राहतातं. अशीच चौदा वर्षापूर्वीच एक खेळी आजही भारतीय क्रिकेट चाहते आजवर विसरु शकले नाहीत.
या विजयानंतर टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार सौरभ गांगुली देखील आपला आनंद लपवू शकला नव्हता आणि थेट लॉर्डसच्या गॅलरीमध्येच त्यानं आपलं टी-शर्ट काढून गरागरा फिरवलं होतं.
आजच्याच दिवशी म्हणजेच 14 वर्षापूर्वी 13 जुलै 2002 रोजी टीम इंडियानं इंग्लंडला त्यांच्याच धरतीवर धूळ चारली होती. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद कैफनं केलेली खेळी चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिली.
संपूर्ण नेटवेस्ट मालिकेत इंग्लडं आणि टीम इंडियामध्ये अटीतटीचे सामने झाले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगाचं लक्ष लागून राहिलं होतं.
क्रिेकेटची पंढरी ओळखलं जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर हा अंतिम सामना होता. नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कर्णधार नासीर हुसैन याने 115 धावांची खणखणीत खेळी केली होती. या सामन्यात इंग्लंडनं तब्बल 325 धावांपर्यंत मजल मारली होती.
हा सामना जिंकून इंग्लंडला इंग्लंडच्याच धरतीवर लोळवण्याची नामी संधी टीम इंडियाकडे होती. मात्र, त्यासाठी तब्बल 325 धावांचा यशस्वी पाठलाग करणं महत्वाचं होतं. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख असणाऱ्या सौरभ गांगुलीनंही विजय मिळवायचाच या जिद्दीनं खेळण्यास सुरुवात केली. सेहवाग आणि गांगुलीनं 106 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला. मात्र, गांगुली बाद झाल्यानंतर टीम इंडिया अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागली. 106 धावांवर 1 बाद अशी अवस्था असताना 146 धावांवर 5 बाद अशी केविलवाणी अवस्था टीम इंडियाची झाली. गांगुली, सेहवाग, मोंगिया, द्रविड आणि तेंडुलकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाज तंबूत परतले होते.
याच वेळी टीम इंडियासाठी दोन तरुण आणि धडाकेबाज खेळाडू धावून आले होते. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह. सुरुवातीला संयमी खेळी करत या दोघांनी डावाला पुन्हा आकार दिला. त्यानंतर त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. आता टीम इंडिया विजयाच्या समीप पोहचणार असं वाटत असतानाच युवराज कॉलिंगवूडच्या एका चेंडूवर फसला आणि 69 धावांवर बाद झाला. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास टीम इंडिया गमावणार का असं वाटू लागलं. पण त्याचवेळी मोहम्मद कैफनं तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेली. या सामन्यात बरेच चढ-उतार आले होते.
आधीच्या मालिकेत ज्या फ्लिंटॉपनं भारतात विजय मिळविल्यावर भर मैदानात टी-शर्ट काढला होता. त्याच्याच ओव्हरमध्ये कैफनं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला होता. ते देखील तीन चेंडू राखून. हा विजय मिळवताच कर्णधार गांगुली मात्र, आपल्या भावना रोखू शकला नव्हता आणि त्यानं लॉर्डसच्या गॅलरीतच थेट आपला टी-शर्ट काढून गरागरा फिरवला होता. हा सामना चाहत्यांना ज्याप्रमाणे कैफच्या खेळीसाठी लक्षात राहिला त्याचप्रमाणे तो गांगुलीच्या बिनधास्त अॅटिट्यूडसाठीही लक्षात राहिला.