सेंट लुशिया (वेस्ट इंडिज): विराट कोहलीची टीम इंडिया आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वेस्ट इंडिजशी कसोटीच्या युद्धासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधली तिसरी कसोटी सेंट लुशियाच्या ग्रॉस आयलेटमधील डॅरेन सॅमी नॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्या संध्याकाळी 7.30 वाजता या कसोटीला सुरूवात होईल.
टीम इंडियानं अँटिगाची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिंकून या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण पावसानं व्यत्यय आणलेल्या जमैकाच्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेसनं झुंजार शतक ठोकून सामना अनिर्णित राखला.
आता टीम इंडियाला मालिकेत विजयी आघाडी घ्यायची असेल तर भारतीय गोलंदाजांमधला ताळमेळ सुधारणं गरजेचं आहे. टीम इंडियानं ही मालिका 3-0 अशी जिंकली, तर भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. त्यामुळं सेंट लुशिया कसोटीत कोहली अँड कंपनी विजय मिळवण्याच्याच निर्धारानं खेळेल.