केप टाऊन : यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार हा प्रश्न सर्वांनाचा पडला आहे. त्यामुळे सर्वजण आपआपले अंदाज व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेदेखील त्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एबीडीने चार संघ यंदाच्या वर्ल्ड कपचे दावेदार असल्याचे म्हटले आहे. भारतीय संघाला एबीडीने पहिली पसंती दर्शवली आहे. तसेच यजमान इंग्लंड, गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघदेखील यंदाच्या वर्ल्डकपचे दावेदार असल्याचे त्याचे म्हणणे आहे.


एबीडीने निवडलेल्या संघांमध्ये पहिला क्रमांक भारताचा आहे. एबीडीच्या मते भारतीय संघ यंदाच्या वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार आहे. तसेच यजमान इंग्लंड, गतविजेता ऑस्ट्रेलिया या दोन संघांची मागील काही महिन्यांमधील कामगिरी पाहता इतर संघांना या दोन्ही संघांचं कडवं आव्हान असणार आहे. पाकिस्तानही एबीडीच्या लिस्टमध्ये आहे.

विशेष म्हणजे एबीडीने निवडलेल्या चारही संघांमध्ये दक्षिण आफ्रिकन संघ नसल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर एबीडीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा वन डे क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे मत व्यक्त केले आहे.


1999, 2007 आणि 2015 च्या वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. परंतु तीनही वेळी आफ्रिकेच्या संघाला उपांत्य फेरीतून परत जावे लागले आहे. अंतिम क्षणी सामना हरल्यामुळे आफ्रिकेच्या संघाची चोकर्स अशी वाईट ओळख क्रिकेट विश्वात झाली आहे.