नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 ने गमावल्यानंतर टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या संतापाचा पारा चढला आहे. सध्याच्या कसोटी संघात असा एकही खेळाडू नाही, जो कर्णधार विराट कोहलीला त्याच्या चुका सांगू शकतो, असं सेहवाग म्हणाला आहे.


विराटसमोर मान वर करुन बोलणारा खेळाडू संघात नसल्याचंही सेहवागने म्हटलं आहे. सेहवागने यापूर्वीही विराटच्या धोरणावर टीका केली होती.

''संघात एका अशा खेळाडूची गरज आहे, जो त्याला त्याच्या चुका सांगू शकतो,'' असं सेहवाग एका न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाला.

''प्रत्येक संघात चार ते पाच असे खेळाडू असतात जे कर्णधाराला सल्ला देतात आणि मैदानात चुकीचा निर्णय घेण्यापासून रोखतात. मात्र सध्याच्या संघात असा एकही खेळाडू नाही जो विराटला सल्ला देईल किंवा त्याला चुकीचा निर्णय घेण्यापासून रोखेल,'' असंही सेहवाग म्हणाला.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री विराटला नक्कीच सल्ला देत असतील, असा विश्वासही सेहवागने बोलून दाखवला. संघात काही मतभेद असतील तर ते सपोर्ट स्टाफसह सर्वांनी एकत्र बसून दूर करणं गरजेचं असल्याचं सेहवागने सांगितलं.

संबंधित बातमी :

... तर विराटने स्वतः संघातून बाहेर बसावं : सेहवाग