या आजीबाई नेमक्या कोण आहेत, याविषयी चर्चांना उधाण आलं. या आजींनी केलेल्या प्रार्थना फळाला आल्यामुळे मुंबई जिंकली, इथपासून आजींना भारत-पाक सामन्याचंही निमंत्रण द्या, अशा वेगवेगळ्या पोस्ट्स व्हायरल झाल्या. मात्र ही वृद्ध महिला कोण आहे, त्याचा थांगपत्ता अनेकांना लागला नाही.
आयपीएलच्या दहाव्या पर्वाची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा उंचावली. या सामन्यात सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या अर्थातच मैदानातील खेळाडूंकडे आणि मैदानाबाहेर, प्रेक्षकांमध्ये बसून देवाचा मनोभावे धावा करणाऱ्या पौर्णिमा यांच्याकडे. एकीकडे नखं खाणारे, खुर्चीच्या टोकावर बसलेले प्रेक्षक होते, तर दुसरीकडे विजयासाठी कौल लावून बसलेल्या या आजीबाई.
या आजीबाई आहेत मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण अर्थात नीता अंबानी यांच्या मातोश्री. या आजीबाईंचं नाव आहे पौर्णिमा दलाल. त्यांना प्रामुख्याने 'नानी' असं संबोधलं जातं, आणि त्या संघाचा लकी चार्म आहेत, असं अभिषेक बच्चनने ट्विटरवर म्हटलं आहे.
https://twitter.com/juniorbachchan/status/866536517325307904
आयपीएलच्या दहाव्या मोसमाची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने उंचावली. रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने मुंबईने विजय मिळवला. आयपीएलमध्ये मुंबईने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं.
मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुण्याने चांगली सुरुवात
केली होती. मात्र अखेरच्या क्षणी पुण्याचा डाव गडगडला. पुणे संघ 6 बाद 128 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
मुंबईच्या या थरारक विजयाचा शिल्पकार ठरला तो डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन. पुण्याला विजयासाठी अखेरच्या षटकांत 11 धावांची गरज असताना, मिचेल जॉन्सननं मनोज तिवारी आणि स्टीव्ह स्मिथच्या विकेट्ससह नऊच धावा मोजून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.