शिर्डी : येत्या एक जूनपासून होऊ घातलेल्या शेतकऱ्यांच्या संपावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुणतांब्यातील राज्यव्यापी शेतकरी बैठकीत हा संपाचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. आज शेतकऱ्यांच्या झालेल्या राज्यव्यापी बैठकीला विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती.

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. यासह अनेक मागण्यांवर शेतकऱ्यांनी ठाम राहून संपाचा निर्णय घेतला आहे. एक जूनपासून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला कोणताही शेतीमाल आणि दुध विकणार नाहीत, त्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे. तसंच शहराकडे जाणारं दुध आणि भाजीपालाही शेतकऱ्यांकडून रोखला जाणार आहे.

दरम्यान 25 जूनपासून शेतकरी पुणतांब्यात धरणं आंदोलनही करणार आहेत.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.

शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.

शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.

संबंधित बातम्या :

पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपाचा इशारा


शेतकऱ्यांच्या प्रस्तावित संपात उभी फूट, एका गटाची माघार


राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडतंय: शिवसेना