पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत फलंदाजीची लय सापडलेल्या रोहित शर्माने पाचव्या वन डेत शानदार शतक झळकावलं. रोहित शर्माचं हे शतक अत्यंत महत्त्वाचं होतं, मात्र तरीही त्याने या शतकानंतर नेहमीच्या शैलीत सेलिब्रेशन केलं नाही.


भारताच्या ऐतिहासिक विजय मिळवलेल्या सामन्यात सामनावीराचा मान मिळवलेल्या रोहित शर्माने या गोष्टीचा खुलासा केला आहे. गैरसमजामुळे महत्त्वाचे फलंदाज विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे धावबाद झाले होते. हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर आपल्यावर दबाव होता आणि लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात होतो, असं रोहित शर्माने सांगितलं.

''माझ्याअगोदरच दोन महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते. त्यामुळेच शतकाचं सेलिब्रेशन केलं नाही. तुमचा मूड कसा आहे, यावर सेलिब्रेशन अवलंबून असतं. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजीतली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न चालू होता,'' असं रोहित शर्मा म्हणाला.

भारताचा दक्षिण आफ्रिकेतला हा पहिलाच मालिका विजय आहे. पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वन डे सामन्यात रोहितने 115 धावांची खेळी केली. रोहित शर्माचं हे दक्षिण आफ्रिकेतलं पहिलंच शतक ठरलं.