Australian Open 2023 Live Streaming : 2022 वर्ष संपत आले आहे. आता नवीन वर्ष येणार असून टेनिस चाहत्यांसाठी  (Tennis) देखील आनंदाची वेळ समोर आली आहे. कारण 2023 वर्षाच्या सुरुवातीला टेनिसप्रेमींना ऑस्ट्रेलियन ओपनच्या रूपाने (Australian Open) मोठी ग्रँडस्लॅम स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेची ही 111 वी आवृत्ती असेल जी दरवर्षीप्रमाणे ऑस्ट्रेलियन समरध्ये खेळवली जाईल. सानिया मिर्झा या स्पर्धेत खेळताना दिसू शकते, तिने 2022 च्या हंगामानंतर निवृत्ती घेण्याचे सांगितले होते. ती दुखापतीमुळे 2022 मध्ये खेळू शकली नाही, म्हणून तिने तिच्या निवृत्ती योजनेत थोडा बदल केला आहे. ज्यामुळे ती यंदा मैदानात उतरु शकते. याशिवाय दिग्गज पुरुष टेनिसपटूमध्ये राफेन नदाल, नोवाक जोकोविच तर महिलांमध्ये सेरेना विल्यम्ससह इतर दिग्गजही कोर्टावर दिसू शकतात.


स्पर्धा कधी आणि कुठे खेळवली जाईल?


ऑस्ट्रेलियन ओपन 2023 ही स्पर्धा 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि 29 जानेवारीला संपणार आहे. पुरुष एकेरीचा अंतिम सामना 29 जानेवारीला, तर महिला एकेरीचा अंतिम सामना 28 जानेवारीला होणार आहे. मेलबर्न पार्कमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.


कुठे पाहता येतील सामने?


भारतीय चाहत्यांना या स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबवर लाईव्ह स्ट्रीमिंग करू इच्छिणाऱ्या चाहत्यांना SonyLiv अॅप किंवा वेबसाइटचा वापर करावा लागेल. पण यासासाठी SonyLIV चे सदस्यत्व घेणे अनिवार्य असेल.


मागच्या वेळीचा चॅम्पियन कोण?


स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने पुरुष गटात गेल्या वेळी विजेतेपद पटकावले होते. या वेळी त्याची कडवी झुंज नोव्हाक जोकोविचशी होणार आहे, ज्याला यापूर्वी कोरोनाची लस न मिळाल्याने स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. महिला गटाची चॅम्पियन स्थानिक खेळाडू ऍशले बार्टी होती, परंतु तिने या वर्षी अचानक खेळाला अलविदा म्हटले, त्यामुळे ती आपल्या विजेतेपदाच्या रक्षणासाठी स्पर्धेत नसणार आहे.






हे देखील वाचा-