सोलापूर : सोलापूरच्या बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. भारताची वर्ल्ड नंबर वन टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या पसंतीनंतरच प्रार्थनाला हा मान मिळाला आहे.
सानिया मिर्झानं रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीत प्रार्थनासोबत खेळण्याची इच्छा असल्याचं अखिल भारतीय टेनिस संघटना अर्थात आयटालाला कळवलं होतं. तर मिश्र दुहेरीसाठी तिनं रोहन बोपण्णाला पसंती दिली होती. सानियाच्या पसंतीनुसारच आयटाच्या निवड समितीनं मिश्र दुहेरीसाठी सानिया आणि बोपण्णा तर महिला दुहेरीसाठी सानिया आणि प्रार्थना ठोंबरे असा संघ निवडला आहे.
21 वर्षीय प्रार्थनानं आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच तर दुहेरीत दहा विजेतेपदं मिळवली आहेत. 2014 साली इन्चिऑन इथं झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रार्थनानं सानियाच्या साथीनं कांस्यपदक मिळवलं होतं.