मुंबई : क्रिकेट जगतातील महान फलंदज सर डॉन ब्रॅडमन यांची आज 110 वी जयंती आहे. 27 ऑगस्ट 1918 रोजी ब्रॅडमन यांचा जन्म झाला. त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे नोंदवले. 99.94 सरासरीने फलंदाजी करणाऱ्या ब्रॅडमन यांना क्रिकेटव्यतिरिक्तही अनेक आवडी-निवडी होत्या. त्यांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. वयाच्या 92 वर्षी त्यांचं निधन झालं.

सर डॉन ब्रॅडमन यांना आज जयंतीनिमित्त इंटरनेट जगतातील जायंट गूगलनेही डूडलद्वारे आदरांजली अर्पण केली आहे.

सर डॉन ब्रॅडमन यांच्याबद्दल 10 रंजक गोष्टी

  1. सर डॉन ब्रॅडमन हे शाळेत असताना, त्यांना गणित विषय आवडत असे. पुढे गणितात करिअर केलं नाही, मात्र क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ब्रॅडमन यांनी विजयाची गणितं अगदी सहज सोडवली आणि क्रिकेट जगतातील सर्वोच्च विक्रमांच्या नोंदी आपल्या नावे केल्या.

  2. सर डॉन ब्रॅडमन यांना संगीताची प्रचंड आवड होती. ते पियानोही वाजवत असत. काही गाण्यांना त्यांनी संगीतही दिले. 'एव्हरी डे इज अ रेन्बो डे फॉर मी' हे गाणं ब्रॅडमन यांनी 1930 साली संगीतबद्ध केले. शिवाय, पियानिस्ट म्हणूनही त्यांनी दोन गाणी केली. त्यात 'अॅन ओल्ड फॅशन्ड लॉकेट' आणि 'अवर बंगलो ऑफ ड्रिम्स' या गाण्यांचा समावेश आहे.

  3. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात एबीसीने सर डॉन ब्रॅडमन यांच्या गौरवासाठी आपला पत्ता ब्रॅडमन यांच्या फलंदाजीच्या सरासरीवरुन ठेवला आहे. 'एबीसी, जीपीओ बॉक्स 9994, ऑल कॅपिटल सिटीज, ऑस्ट्रेलिया' असा एबीसीचा पत्ता आहे.

  4. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा उभारणारे नेल्सन मंडेला हे ज्यावेळी 27 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर आले, त्यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली, त्यात त्यांनी विचारले होते, "डॉन ब्रॅडमन अजून जिवंत आहेत का?"... सर डॉन ब्रॅडमन यांचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात होते. दस्तुरखुद्द नेल्सन मंडेलाही ब्रॅडमन यांचे चाहते होते.

  5. सर डॉन ब्रॅडमन यांनी वयाच्या 23 व्या वर्षी म्हणजे 1931 साली एका सामन्यात 18 मिनिटात शतक ठोकलं होतं. त्यावेळी 8 बॉलची ओव्हर असायची. 22 बॉलमध्ये ब्रॅडमन यांनी शंभरी गाठली होती. 6, 6, 4, 2, 4, 4, 6, 1, 6, 4, 4, 6, 6, 4, 6, 4, 6, 6, 1, 4, 4 आणि 6 अशी ब्रॅडमन यांनी फलंदाजी केली होती.

  6. सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत फलंदाजीत 99.94 अशी सरासरी ठेवली. जर त्यांनी शेवटच्या सामन्यात 4 अधिक धावा केल्या असत्या, तर 100 टक्के सरासरी त्यांच्या नावावर नोंद झाली असती.

  7. सर्वाधिक वेगाने 19 शतकांपर्यंत पोहोचण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.

  8. सर डॉन ब्रॅडमन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकूण 31 द्विशतकं ठोकली आहेत. इतर कुणाही क्रिकेटरला ते अद्याप शक्य झाले नाही. सर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोनच देशात फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन कधीच स्टम्पिंगवर बाद झाले नाहीत.

  9. क्रिकेटव्यतिरिक्त ब्रॅडमन यांच्या वेगवेगळ्या आवडी-निवडी होत्या. त्यांना चहा प्रचंड आवडत असे. खेळांमध्ये टेनिस, गोल्फ, स्क्वॅश, रग्बी लिग इत्यादी खेळ त्यांना आवडत. पियानो वाजवायला आवडत असे.

  10. सर डॉन ब्रॅडमन यांनी शाळेतील मैत्रीण जेस्सी मेन्झिज हिच्याशी सिडनीत 30 एप्रिल 1932 रोजी लग्न केलं. 1997 च्या एप्रिलमध्ये ब्रॅडमन आणि त्यांच्या पत्नीने लग्नाचा 65 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर चारच महिन्यात 14 सप्टेंबर 1997 रोजी ब्रॅडमन यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर तीन वर्षांनी 25 फेब्रुवारी 2001 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी ब्रॅडमन यांचं निधन झालं.