नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एक पराक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलंडणारा विराट हा भारताचा अकरावा खेळाडू बनला आहे.


दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीने सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर कव्हर्समध्ये चौकार ठोकत या पराक्रमाला गवसणी घातली.

विराटने 63 कसोटी सामन्यामध्ये 19 शतकं आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने हा टप्पा ओलांडला. भारतातर्फे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यात सर्वाधिक 15,921 धावा केल्या आहेत. यामध्ये 51 शतकांचा समावेश आहे.

याआधी भारताच्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडाप्पा विश्वनाथ आणि कपिल देव या फलंदाजांनी पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

गावसकर, सेहवागच्या मागे, पण सचिन आणि द्रविडच्या पुढे

विराट कोहली आपल्या 5000 धावांचा टप्पा 63 कसोटी सामन्यांमधील 105 डावांमध्ये पूर्ण केला आहे.

सुनील गावसकर यांनी 52 सामन्यांमधील 95 डावात, तर सेहवागने 59 कसोटींमधील 99 डावात 5 हजार धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकरने 67 कसोटींच्या 103 डावांमध्ये 5000 धावा केल्या.

टीम इंडियाचा 'द वॉल' म्हणजेच राहुल द्रविडने 63 सामन्यांमधील 108 धावांमध्ये पाच हजार धावा केल्या.

मात्र ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी 36 सामन्यांमधील 56 डावांमध्ये सर्वात जलद 5000 धावा केल्या आहेत.