बंगळुरु : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत इंग्लंडचा 75 धावांनी धुव्वा उडवून तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. 4 षटकात 25 धावा देऊन 6 विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल या विजयाचा खरा हिरो ठरला.


इंग्लंडकडून जेसन रॉय 32, ज्यो रुट 42 आणि कर्णधार इयॉन मॉर्गन 40 यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यजुवेंद्र चहलच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची जादू चालू शकली नाही. चहलने केवळ 25 धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं.

चहलनंतर भारताकडून जसप्रित बुमराने 3, तर अमित मिश्राने एक विकेट घेतली. भारताने दिलेल्या 203 धावांच्या बलाढ्य आव्हानासमोर इंग्लंडचा डाव 127 धावांवरच गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.

विकेटचा षटकार मारणाऱ्या चहलला सामनावीराचा आणि मालिकाविराचा सन्मान देण्यात आला.

भारताची दमदार फलंदाजी

बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारतानं इंग्लंडला विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतानं 20 षटकांत 6 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला होता.

‘एम एस धोनी’  चित्रपटातील डायलॉग ‘माही मार रहा है’ला साजेशी फटकेबाजी धोनीने केली. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंगच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताला 202 धावांची मजल मारता आली. रैनानं 63 धावांची, धोनीनं 56 धावांची तर युवराजनं 27 धावांची खेळी केली. धोनीने टी ट्वेंटी मध्ये पहिल्यांदाच अर्धशतक साजरं केलं.

लोकेश राहुलनंही 22 धावा फटकावल्या. तर हार्दिक पांड्या 11 धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहली मात्र दोनच धावांवर धावचीत झाला होता. पदार्पणातच ऋषभ पंतने नाबाद 6 धावा केल्या.

कसोटी, वन डेनंतर टी-20 मध्येही इंग्लंडचा पराभव

इंग्लंडला भारतातून मालिका विजयाची चव चाखल्याशिवायच परतावं लागणार आहे. कारण 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट ब्रिगेडने इंग्लंडला 4-0 ने धूळ चारली होती. त्यानतंर तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली आणि त्यानंतर 3 सामन्यांची टी ट्वेंटी मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे.