पोर्ट एलिझाबेथचं मैदान आणि भारत
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये आतापर्यंत एकही वन डे सामना जिंकलेला नव्हता. आतापर्यंत इथे खेळलेल्या सर्वच्या सर्व पाचही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. एवढंच नाही, तर केनियानेही भारतावर या मैदानात मात केली होती. पाचही सामन्यांमध्ये भारताला 200 पेक्षा जास्त धावांचा पल्ला ओलांडता आलेला नाही. आतापर्यंत खेळलेला पाच सामन्यांमध्ये भारताची धावसंख्या 147, 179, 176, 163 आणि 142 अशी आहे.
मात्र या सामन्यात भारताने 274 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि दक्षिण आफ्रिकेवर मात केली. पोर्ट एलिझाबेथच्या मैदानातला वाईट इतिहास पुसत टीम इंडियाने नवा इतिहास रचला
पोर्ट एलिझाबेथची हवा भारताची सर्वात मोठी समस्या
पोर्ट एलिझाबेथमधील वेगवान वारं ही भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या होती. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही या खेळपट्टीवर लय सापडण्यास अडचणी येतात. हवामान विभागानेही सामन्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला वेगवान वाऱ्याचा इशारा या सामन्यापूर्वी दिला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी सर्व समस्यांवर मात करत दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला.
रोहित शर्माचं कमबॅक, शतकी खेळी
गेल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं सतरावं शतक झळकावलं. त्याने 126 चेंडूंमधली 115 धावांची खेळी अकरा चौकार आणि चार षटकारांनी सजवली. रोहितने शिखर धवनच्या साथीने 48 धावांची सलामी दिली. मग त्याने विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची आणि श्रेयस अय्यरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली.
25 वर्षात पहिला मालिका विजय
- भारताला 1992-93 साली सात वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-5 ने पराभव स्वीकारावा लागला
- 2006-07 साली चार वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-4 ने पराभव स्वीकारावा लागला
- 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला
- 2013-14 साली तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला
- 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने आघाडीवर