मल्लिका शेरावत सध्या फ्री-ए-गर्ल इंडियासाठी काम करत आहे. फ्री-ए-गर्ल ही संस्था मानवी तस्करीत तसेच मुलांच्या लैंगिक शोषणा विरोधात काम करते. या संस्थेचे संस्थापक एवलीन होल्स्कन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. पण त्यांना भारताचा व्हिसा मिळत नसल्याने, मल्लिकाने ट्वीट केलं आहे.
मल्लिकाने सुषमा स्वराज यांना ट्वीट करताना म्हटलंय की, “सुषमा स्वराजजी, फ्री-ए-गर्ल या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक भारतात येणार आहेत. पण त्यांना भारताचा व्हिसा मिळत नाही आहे. त्यांचा अर्ज अनेकवेळा रद्द करण्यात आला आहे. ही संस्था मानवीतस्करी रोखण्यासाठी महत्त्वाचं काम करत आहे. कृपया मदत करावी”
फ्री-ए-गर्ल ही संस्था मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती मोहीम राबवत आहे. तसेच, बालवेश्या व्यावसायासंदर्भातील कायदे आणखी कडक करावेत, अशी मागणीही या संस्थेने केली आहे.
मल्लिका शेरावत या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या 'स्कूल फॉर जस्टिस' कार्यक्रमाची ब्रॅण्ड अम्बेसडर आहे. या कार्यक्रमांतर्गत वेश्यावस्तीतून सुटका केलेल्या मुलींना शिक्षण, ट्रेनिंग, आणि इतर मदत दिली जाते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मल्लिकाला पॅरिसमधील घराचे भाडे थकवल्याने घरमालकाने तिला नोटिस बजावली होती. या वृत्ताची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. पण मल्लिकाने हे वृत्त फेटाळले होते.