शारजा : गतविजेत्या भारतीय संघानं पाकिस्तानचा दोन विकेट्सनी पराभव करुन, अंधांच्या विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. भारतानं 2014 साली पहिल्यांदा अंधांचा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी बजावली होती. त्यानंतर यंदा अजय तिवारीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं अंधांचा विश्वचषक पुन्हा जिंकला.

अंधांच्या पाचव्या विश्वचषकाचं आयोजन संयुक्त अरब अमिरातीत करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम सामना शारजातल्या शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला.

या सामन्यात पाकिस्ताननं विजयासाठी दिलेलं 308 धावांचं लक्ष्य भारतीय संघानं दोन विकेट्स राखून पार केलं. सुनील रमेशची 93 धावांची, तर अजय रेड्डीची 62 धावांची खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली.

त्याआधी, पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 40 षटकांत आठ बाद 307 धावांची मजल मारली होती.