नवी दिल्लीः आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया खेळणार की नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. बीसीसीआय विरुद्ध आयसीसी यांच्यातील वाद याचं कारण आहे. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यातील वादामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या समावेशावर प्रश्न चिन्ह आहे.
काय आहे बीसीसीआय विरुद्ध आयसीसी वाद?
बीसीसीआयकडून या वर्षी भारतात टी - 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मालिकेसाठी आयसीसीने बीसीसीआयला 300 कोटी रुपये दिले होते. मात्र इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसी इंग्लंडला 900 कोटी रुपये देणार आहे.
टी- 20 विश्वचषकाच्या 27 दिवसांमध्ये 58 लढती झाल्या होत्या. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी केवळ 18 दिवस चालणार असून 15 सामने होणार आहेत. तरीही आयसीसी इंग्लंडला 900 कोटी रुपये देणार आहे. याच कारणामुळे बीसीसीआय नाराज असून आयसीसीला इशारा देखील दिला आहे.
मात्र शशांक मनोहर आणि अनुराग ठाकूर यांच्यात हे प्रकरण चर्चेने सोडवण्यास कोणीही उत्सुक नसल्याचं दिसतं. इंग्लंडमध्ये राहण्याचा आणि आयोजनाचा खर्च भारतापेक्षा जास्त असल्यामुळे जास्त रक्कम देण्यात येत आहे, असं स्पष्टीकरण शशांक मनोहर यांनी दिलं आहे. दरम्यान या वादामुळे खेळाडूंसह जगभरातील प्रेक्षकांचा जीव सध्या भांड्यात पडला आहे.